Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शनिवार, दि. ७/१०/२०२३, रोजी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द या संस्थेच्या उपकरणीकरण व नियंत्रण अभियांत्रिकी विभागामध्ये नव्याने स्थापित फोर्ब्स मार्शल उत्कृष्टता केंद्राचा उद्घाटन समारंभ डॉ. विनोद मोहितकर, मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जी. एम. फोर्ब्स मार्शल, पुणेचे मा. श्री. चंद्रशेखर धामणकर, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणेचे सहसंचालक मा. डॉ. दत्तात्रय जाधव, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे उपसंचालक मा. डॉ. धनपाल कांबळे, शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द चे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे आणि शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी खुर्द चे प्राचार्य डॉ. वाय. बी. चव्हाण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विनोद मोहितकर सरांनी सदरील प्रयोगशाळेचे महत्व व तसेच सदर प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशी उपयुक्त आहे हे विशद केले. त्यानंतर त्यांनी NBA व NAAC मानांकन याविषयी मार्गदर्शन करून नवीन शैक्षणिक धोरण (NEP) व त्यासोबत होऊ घातलेले बदल याबद्दल सविस्तर विवेचन केले. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक बाबींविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. श्री. चंद्रशेखर धामणकर, जी. एम., फोर्ब्स मार्शल पुणे, यांनी विद्यार्थ्यासाठी SWOT Analysis, संभाषण कौशल्य, इंग्रजी भाषा यांचे कंपनीमध्ये असलेले अनन्यसाधारण महत्व विशद केले. डॉ. धनपाल कांबळे, उपसंचालक तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील मल्टीडीसिप्लीनरी कोर्सेस व मल्टीडीसिप्लीनरी उत्कृष्टता प्रयोगशाळा यांचे महत्व नमूद केले. डॉ. दत्तात्रय जाधव, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे यांनी NBA व NAAC मानांकनाची गरज उपस्थितांच्या लक्षात आणून देऊन त्याकरिता संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहित केले.

उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर मा. संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना, उपक्रमांना भेट देऊन संस्थेच्या वाटचालीचा व एकूण शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले “मतदार जनजागृती” या विषयावर सादर केलेले पथनाटय पाहून मा. संचालक व इतर मान्यवर अत्यंत प्रभावित झाले. यावेळी सर्व मान्यवरांनी “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत “अमृत कलशात” माती टाकली तसेच “सेल्फी विथ माय साॅईल” या उपक्रमांतर्गत मुठभर माती हातात घेऊन सेल्फीही काढले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा अहवाल मा. संचालक यांना अवगत केला. संस्थेतील उपकरणीकरण व नियंत्रण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. नवनाथ नेहे यांनी उत्कृष्टता केंद्राची प्रस्तावना केली व सदर केंद्र स्थापन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रशेखर सेवतकर, यंत्र अभियांत्रिकी विभाग यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. मिलिंद बोनगुलवार, उपकरणीकरण व नियंत्रण अभियांत्रिकी विभाग यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द आणि शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी खुर्द या दोन्ही संस्थांमधील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.